भारतीय मालमत्ता फ्रान्स मध्ये गोठवण्यात आल्याविषयीच्या वृत्तावर अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण
केन एनर्जी या कंपनीने भारताच्या मालकीची पॅरिसमध्ये असलेली मालमत्ता जप्त केली/गोठवली असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र, केंद्र सरकारला या संदर्भात कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही, या संदर्भात, फ्रान्सच्या न्यायालायाकडून काहीही आदेश अथवा संपर्क झालेला नाही.
या संदर्भातील तथ्ये जाणून घेण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याबबत कुठलीही नोटीस अथवा आदेश आल्यास, कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेऊन, भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य त्या कायदेशीर उपाययोजना केल्या जातील.
डिसेंबर 2020 च्या आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशा मागणीची याचिका भारताने, 22 मार्च 2021 रोजीच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली आहे. या न्यायालयात भारताची बाजू पूर्ण ताकदीने मांडण्यासाठी, केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
केन एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी देखील हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधला होता. यावेळी, ठोस आणि सकारात्मक चर्चा झाली असून, देशाच्या कायदेशीर चौकटीत, हा विवाद परस्पर सामंजस्याने सोडवण्यासाठी भारत सरकार कायम तयार आहे.
