एनडीए च्या द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ राष्ट्रपति; यशवंत सिन्हा यांचा केला पराभव
नवी दिल्ली, दि. २१ : २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून विजयासाठी अभिनंदन केले. यावेळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते.
ट्विट करून अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देशाने आज इतिहास रचला आहे. १.३ अब्ज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना, पूर्व भारतातील दुर्गम भागात आदिवासी समाजातून जन्मलेल्या भारताच्या कन्येची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे! या विजयाबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे हार्दिक अभिनंदन.”
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा सामना विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी झाला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य युनिट्सने विजयानंतर जल्लोषाची तयारी केली आहे. पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना ५४० तर सिन्हा यांना २०८ मतं मिळाली होती. दुसर्या फेरीतही आघाडी घेत द्रौपदी मुर्मू यांनी १३४९ मतं मिळवली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली.
