संरक्षण संपादन प्रक्रिया- २०२० मध्ये सुधारणा
संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण संपादन प्रक्रिया-२०२० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तिन्ही सैन्य दलं आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणाची गरज लक्षात घेऊन स्वदेशी साहित्याची खरेदी केली जाईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातील उद्योगांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी इंटिग्रिटी पॅक्ट बँक गॅरंटीची आवश्यकता पूर्ण करण्यात आली आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्याची संधी अंतिम निवड करण्यात आलेल्या विक्रेत्यांमध्ये विभागून देण्यात येईल.
तांत्रिक दृष्टया पात्र असणाऱ्या पण करार न झालेल्या विक्रेत्यांना इतर बाजारपेठांमध्ये संधी शोधण्यासाठी उत्पादनाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
