राज्यात सर्वत्र दिवाळीच्या सणाचा उत्साह
मुंबई, दि. १२: प्रकाशाचा सण दीपावली सर्वत्र पारंपरिक उत्साहाने साजरा होत आहे. महाराष्ट्रात नरकचतुर्दशीला पहाटे सुर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन दिवाळी साजरी केली गेली. घरोघरी रांगोळ्या, तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदिल, पणत्या अशी सजावट शोभून दिसते आहे. फराळाचे पदार्थ, नवे कपडे आणि काही प्रमाणात फटाके हे या सणाचं वैशिष्ट्य.दिवाळीच्या निमित्तानं देश आणि राज्यात ठिकठिकाणी सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात येत आहे. दिवाळीच्या सर्वच दिवशी राज्यात ठिकठीकाणी गायन वादन नृत्याच्या संगितमय दिवाळी पहाट कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या पुण्यातील श्री शनी मारुती बालगणेश मंडळाने, एका अनोख्या उपक्रमाद्वारे समाजासमोर एक नवा पायंडा घालून दिला. या मंडळानं शहरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या लक्ष्मींचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा लक्ष्मीपूजनानिमित्त सन्मान केला.
नांदेडमध्ये कालपासून गोदावरी नदी काठावर बंदाघाट इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. दीपावलीच्या निमित्त शिर्डी इथं श्री साईबाबा देवस्थानच्या वतीने साईबाबांच्या मंदिरात, द्वारकमाई इथं आणि परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही काल फुलांची आकर्षक सजावट केली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं आस्था जनविकास संस्थेच्या वतीनं दिवाळीनिमित्त गरजूंना दिवाळी साहित्यासह कपडे आणि मिठाईवाटप करण्यात आलं. वाळूज पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारधी वस्त्यांवर शालेय साहित्य तसंच मिठाईचं वाटप केलं. कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई तसंच भेटवस्तूंचं वाटप करून दिवाळी साजरी केली.
यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत फाउंडेशनने वंचितांबरोबर दिवाळीचा सण साजरा केला. रस्त्यावर भटकणाऱ्या वंचितांना अभ्यंगस्नान घालून नवे कपडे देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातही दिवाळीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने गरीब कुटुंबात फराळ आणि आवश्यक साहित्य देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
