उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह बिहार येथील काही राजद नेत्यांच्या मालमत्तेवर सीबीआयचे छापे
पाटणा, दि. २४ : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या गुरुग्राम इथल्या बांधकाम सुरु असलेल्या एका मॉलवर सीबीआयने आज छापा टाकला. माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी लालू प्रसाद यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या कार्यकाळात नोकरीच्या बदल्यात भूखंड बळकावल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
गुरुग्राम इथली आजची कारवाई याच प्रकरणाशी संबंधित आहे. याच प्रकरणी राजदचे खासदार फैयाज अहमद आणि अशफाक करीम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी सुरु आहे. राजदचे विधान परिषद सदस्य सुनील कुमार सिंह आणि विधान परिषदेचे माजी सदस्य सुबोध राय यांच्या निवासस्थानी देखील सीबीआयने आज छापेमारी केली.
Source – AIR
