कॅगच्या अहवालात राज्यातल्या आर्थिक स्थितीबाबत नोंदवली गेली महत्वाची मतं
मुंबई, दि. २५ : २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोविड महामारी, त्यामुळे पुकारलेली टाळेबंदी आणि त्यांचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने योजलेल्या उपायांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला, असं कॅगच्या राज्य अर्थव्यवस्था आणि लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत कर महसुलात १३ पूर्णांक ७ शतांश टक्के अशी लक्षणीय घट झाली. भांडवली खर्चात १८ पूर्णांक ४८ शतांश टक्के घट झाली तर बाजारपेठीय कर्जामध्ये ५१ पूर्णांक ५९ शतांश अशी मोठी वाढ झाली. मात्र खर्चातही कपात झाल्याने वित्तीय तूट आणि राज्याचं स्थूल अंतर्गत उत्पादन यांचं गुणोत्तर २ पूर्णांक ६९ शतांश टक्के राहिलं. सर्व प्रकारच्या कर महसुलात घट झाली असली तरी केंद्र सरकारकडून सुमारे २८४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्याला प्राप्त झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
