अपघातात १३ प्रवाशांचा झाला मृत्यू
खलघाट आणि ठिगरी दरम्यान पूल ओलांडताना ही बस नर्मदा नदीपात्रात कोसळली. बसमधे सुमारे ५० प्रवासी होते असा अंदाज मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. त्यातल्या १३ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यातल्या ८ जणांची ओळख पटली आहे. एकूण १५ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळी मदतीसाठी ९५५ ५८९ ९०९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही शोक व्यक्त केला असून सर्वतोपरी सहाय्य देऊ केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौहान यांच्याशी चर्चा केली असून सर्व सहकार्य करण्याची विनंती केली.
