पनवेल येथील डॉक्टरने लपविली मुलीची परदेशवारीची माहिती; नियमानुसार ‘होम क्वारंटाईन’ टाळत डॉक्टरने स्वतः अनेक बालरुग्णांची केली तपासणी
पनवेल : राज्य आणि देशासकट जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे सर्व सरकारी यंत्रणा हैराण झाल्या आहेत. अशातच पनवेल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन पनवेल येथील साई चाईल्ड केअरचे प्रमुख डॉ. महेश मोहिते नामक बालचिकित्सकाने स्वतःच्या मुलीची परदेशवारी संदर्भातील माहिती प्रशासनाकडे लपवत या दरम्यान आपल्या रुग्णालयातील बालकांच्या तपासण्या चालूच ठेवल्या होत्या. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पनवेल महानगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी डॉ. महेश मोहिते यांना परिवारासकाट १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याची रुग्णालय बंद करण्याची काल नोटीस धाडली हाती. या नंतर आयुक्तांनी या इस्पितळाला सील केले आहे. या काळात जर डॉ. मोहितेंनी इस्पितळ चालू ठेवले तर त्याचा परवाना पुढील १ वर्षासाठी रद्द केला जाईल असेही आयुक्तांनी आपल्या नोटीस मध्ये नमूद केले आहे.
डॉ. मोहिते यांची कन्या स्वरा महेश मोहिते १६ मार्च रोजी अमेरिकेहून भारतात आली. यानंतर जबाबदार डॉक्टर या नात्याने त्यांनी या संदर्भातली माहिती प्रशासनाला कळवून मुलीसह स्वतः “होम क्वारंटाईन” मध्ये राहणं गरजेचं होतं पण त्यांनी अतिशय निष्काळजीपणा करत गेल्या पंधरा दिवस रुग्णांची तपासणी करत उपचारही केले. आता पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला या दरम्यान ज्या बाल रुग्णांचा व त्यांच्या परिवाराचा या डॉक्टरशी व येथील कर्मचारी वर्गाशी संबंध आला त्या सर्वांच्या तपासण्या करण्याचे मोठे आवाहन आहे. मुळात बालचिकिस्ता क्षेत्रात रुग्णसेवा बजावणाऱ्या डॉक्टर कडून असे बेजबाबदार वर्तन अपेक्षित नव्हते. पण १५ दिवस रुग्णालय बंद ठेवले तर आर्थिक नुकसान होईल अशी असंवेदनशील मानसिकता असलेल्या डॉ. मोहिते सारख्यांचा वैद्यकीय परवाना इंडियन मेडिकल असोसिएशनने कायमचा रद्द करणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांकडून असे वर्तन पुनः घडणार नाही.


