एम्स नागपूर महाराष्ट्रातील पूर्ण एनएबीएच मानांकन मिळवणारे पहिले सार्वजनिक रुग्णालय
नागपूर, दि. १५: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर यांना भारतीय गुणवत्ता परिषद अंतर्गत रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदाते यांच्यासाठी राष्ट्रीय मानांकन मंडळाकडून (एनएबीएच) पूर्ण मानांकन प्रदान करण्यात आले आहे. संस्थात्मक गुणवत्ता हमीच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या मान्यतेमुळे `एआयआयएमएस`- एम्स नागपूर हे महाराष्ट्रातील पूर्ण एनएबीएच मानांकन मिळवणारे पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरले आहे. या मानांकनात देशातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सर्वाधिक व्यापक व्याप्तीतील चिकित्सीय सेवा समाविष्ट आहेत, ज्यामध्ये प्रमुख विशेषता, अतिविशेषता, प्रत्यारोपण सेवा आणि अतिदक्षता सेवा यांचा समावेश आहे.
संस्थेचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी संस्थेचे अभिनंदन करताना सांगितले की, हे मानांकन प्राध्यापक, निवासी डॉक्टर, शुश्रुषा अधिकारी आणि प्रशासकीय पथक यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. सक्षम गुणवत्ता प्रणाली निर्माण करणे आणि सुरक्षित, रुग्णकेंद्री आरोग्यसेवा सुनिश्चित करणे यासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे हे प्रतीक आहे. या यशामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तृतीयक आरोग्यसेवा केंद्र म्हणून संस्थेची प्रतिमा अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश नाडगेवे यांनी सांगितले की, या मानांकनामुळे रुग्णसुरक्षा, दर्जेदार आरोग्य सेवा आणि सातत्यपूर्ण सुधारणा याबाबत संस्थेची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.
एनएबीएच पूर्ण मानांकन प्रक्रिया ही रुग्णसुरक्षा शिष्टाचार, चिकित्सीय प्रशासन, पायाभूत सुविधा, दस्तऐवजीकरण मानके, संसर्ग नियंत्रण पद्धती, औषध सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि संपूर्ण रुग्णालयातील गुणवत्ता सुधारणा प्रणाली यांचे सर्वंकष व कठोर मूल्यमापन करते.
ही मानांकन प्रक्रिया संयुक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मराठे यांच्या समन्वयातून पार पडली असून सर्व विभाग व रुग्णालय समित्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ष २०१९ पासून चिकित्सीय सेवा सुरू झाल्यापासून एम्स नागपूरने २५ लाखांहून अधिक बाह्यरुग्ण आणि १ लाखांहून अधिक अंतर्गत रुग्णांवर उपचार केले असून ४२,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया, ज्यामध्ये मोठ्या व अतिमोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे, यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या नव्या मानांकनामुळे मध्य भारतातील एक महत्त्वाचे तृतीयक सार्वजनिक आरोग्यसेवा संस्थान म्हणून एएम्स नागपूरची वाढती भूमिका अधोरेखित झाली आहे.
