सीजीएसटी ठाणे शाखेने १७२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचा केला पर्दाफाश
मुंबई, १२: सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या करचोरी विरोधी शाखेने अंदाजे ९५२ कोटी रुपयांच्या वस्तू आणि सुमारे १७२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) शी संबंधित एक मोठी बनावट जीएसटी क्रेडिट फसवणूक उघडकीस आणली आहे.
कागदपत्रे आणि तपासाच्या आधारे, मेसर्स फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भौमिक गिरीशभाई गांधी (GSTIN: 27AAFCF0626D1Z2) याने मालाची प्रत्यक्ष पावती किंवा पुरवठा न करता अपात्र आयटीसी मिळवणे आणि ते दुसऱ्याला देणे या प्रकारामुळे गांधी हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले.
मेसर्स फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या पुरवठादारांवर अधिकारक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अनेकदा छापे घातले , ज्यामध्ये कंपनी अस्तित्वात नसल्याचे किंवा रद्द झाल्याचे उघड झाले, जे बनावट व्यवहार दर्शवते. भौमिक गिरीशभाई गांधी याच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यांमध्ये फसव्या व्यवहारांची पुष्टी करणारे गुन्हेगारी पुरावे सापडले.
चौकशीदरम्यान, गांधी याने सीजीएसटी कायदा, १०१७ च्या कलम ७० अंतर्गत स्वेच्छेने दिलेल्या निवेदनात फसवणुकीचा सूत्रधार, कमिशन मिळवणे आणि बेकायदेशीर रकमेचा थेट फायदा घेण्यातली आपली भूमिका कबूल केली. १० फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने कर फसवणुकीविरुद्ध आपली कडक भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे आणि जीएसटी चुकवण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
