भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी नवी मुंबईतील ४०० हून अधिक शाळांमध्ये साजरा झाला वाचन प्रेरणा दिन
नवी मुंबई, दि. १६: भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी स्मृतींना वंदन करत शासन परिपत्रकान्वये त्यांचा जयंतीदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासली जावी व अवांतर वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या ४२९ शाळा महाविदयालयांमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृतीची जपणूक करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सूचित करण्यात आले होते.
त्यानुसार काल भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करत विविध शाळांमध्ये वेगवेगळया प्रकारचे उपक्रम उत्साहाने राबविण्यात आले. या अंतर्गत काही शाळांमध्ये विविध लेखकांची पुस्तके, कथासंग्रह, कविता संग्रह विदयार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. विदयार्थ्यांची आकलनशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने काही शाळांमध्ये पुस्तकांमधील काही भागांचे जाहीर वाचन करुन त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले व विदयार्थ्यांना त्याची उत्तरे विचारुन माहिती संग्रहण व त्याचे सादरीकरण असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे साहित्यावर आधारित व्याख्याने व स्पर्धांचेही आयोजन काही शाळांनी केले.
या उपक्रमांमध्ये काही शाळांनी शिक्षक, विदयार्थी यांच्याप्रमाणेच पालकांनाही सहभागी करुन घेतले. त्याचप्रमाणे पुस्तकातील काही भागांच्या चक्री अभिवाचनाचा अभिनव प्रयोगही काही शाळांनी राबविला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महावाचन उपक्रमांतर्गत कोपरखैरणे गाव येथील शाळेत २ सप्टेंबर रोजी नुकताच ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला विदयार्थी, पालकांचा मोठया प्रमाणावर पसंतीचा सहभाग लाभला होता. याच धर्तीवर काही शाळांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच काही खाजगी शाळांमध्ये वाढदिवसाला पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरु असून या माध्यमातून वाचन संस्कृतीची जपणूक व जोपसना होत असल्याचे लक्षात घेऊन सर्वच शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत पुढाकार घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. अनेक शाळांनी आपल्या स्तरावर शालेय अनुदानातून विदयार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी केली आहेत व ती विदयार्थ्यांना वाचनाकरता उपलब्ध करुन दिली आहेत.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विदयार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी जीवन समृध्द करणाऱ्या पुस्तकांशी मैत्री करावी या दृष्टीने या विविध उपक्रमाच्या माध्यमांतून वाचनप्रेमाची रुजवात करण्यात आली व स्मार्टफोन, संगणक यांचा गरजेपुरता वापर करावा असेही सूचित करण्यात आले. वाचन प्रेरणा दिन हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता या दिनापासून वाचनाची सुरुवात करावी आणि दररोज काही ना काही अवांतर वाचन करावे हा विचार विदयार्थ्यांच्या मनावर संस्कारित करण्यात आला.
नवी मुंबईतील ४०० हून अधिक शाळा महाविदयालयातील २ लाखाहून अधिक विदयार्थ्यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून त्यांचा जयंती दिवस अर्थात वाचन प्रेरणा दिन स्मृतींना वंदन करीत त्यांच्या पुस्तकांचे व इतर पुस्तकांचे वाचन करीत उत्साहाने साजरा केला.
