गणेशोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता प्रचार – प्रसारासाठी अभिनव आरतीसंग्रह उपक्रम
नवी मुंबई, दि. ९: या वर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले असून विविध माध्यमांतून हे आवाहन नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या करिता आधुनिक सोशल मिडीयाच्या ऑनलाईन माध्यमांप्रमाणेच पारंपारिक मुद्रित माध्यमांचाही प्रभावी उपयोग करण्यात येत आहे.
गणेशोत्सव कालावधीत श्रीगणेशासमोर पूजन करतांना आरत्या म्हटल्या जातात हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला असून दुमड पानांच्या स्वरुपातील या आकर्षक आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपारिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत व दुस-या बाजूस स्वच्छता विषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिंक जलस्त्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत.
या आरती संग्रहाचे प्रकाशन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थित करण्यात आले. हे आरती संग्रह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सोसायट्या व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपारिक माध्यमाचा उपयोग करुन स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
