आतापासून नवी मुंबईकरांना ‘क्यू आर (QR CODE)’ सुविधेमार्फत पाणी पुरवठा देयक भरता येणार
नवी मुंबई, दि. ५: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाणी देयके भरण्याकरिता यापूर्वीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तथापि सध्याच्या काळात विविध देयके भरण्याकरिता नागरिकांकडून मोठया प्रमाणात होणारा विविध पेमेंट ॲपचा वापर लक्षात घेउुन नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या पाणी देयकावर क्यू आर कोड (QR CODE) सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सुरु होती. त्यास अनुसरुन नुकत्याच वितरीत करण्यात आलेल्या जून-जुलै २०२४-२०२५ महिन्यांच्या पाणी देयकांवर क्यू आर कोड (QR CODE) छापण्यात आले असून आता नागरिक पाणी देयकांवर असलेले क्यू आर कोड स्कॅन करुन अगदी सहजपणे आपली पाणी देयके भरणा करु शकतात.
माहे जून-जुलै २०२४-२०२५ च्या पाणी देयकावर क्यू आर कोड (QR CODE) छपाई करण्यात आला आहे. प्रत्येक पाणी देयकावर ग्राहकनिहाय स्वतंत्र क्यू आर कोड (QR CODE) छपाई करण्यात आलेला आहे. सदर क्यू आर कोड (QR CODE) गुगल लेन्सने स्कॅन केल्यावर एक लिंक नागरिकांच्या स्क्रीनवर येईल. त्यावर क्लिक केले असता मोबाईलमध्ये उपलब्ध असणा-या पेमेंट ॲपची यादी दर्शविली जाईल. त्यातून योग्य त्या ॲपची निवड करुन नागरिक आपले पाणी देयक भरणा करु शकतात. त्यामुळे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागात व कार्यालयात न जाता आहे त्या ठिकाणाहून आपले पाणी देयक भरणा करता येऊ शकते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने ‘अभय योजना’ सद्यस्थितीत सुरु आहे. त्या अंतर्गत थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने वितरीत करण्यात आलेल्या माहे जून – जुलै २०२४ या कालावधीत पाणी देयकात नमूद केलेली थकीत पाणी देयकातील मूळ रक्कम व विलंब आणि दंडात्मक शुल्काची २५% रक्कम भरल्यास विलंब व दंडात्मक शुल्काची ७५% रक्कम माफ होणार आहे. त्यासाठी संपूर्ण थकीत पाणी देयक रक्कम माहे जून-जुलै २०२४ देयकाच्या विहित मुदतीत भरणा केल्यास सदर अभय योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर पाणी देयक भरणेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या वेबसाईट प्रमाणेच आता पाणी देयकावर छापलेल्या क्यू आर कोड (QR CODE) चाही उपयोग होणार असून नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
