क्रीडा शिष्यवृत्ती देणारी राज्यातली पहिली महानगरपालिका म्हणून गौरव
नवी मुंबई, दि. ३: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांना थेट मुंबई विभागीय स्तरावर खेळण्याची सुवर्ण संधी लाभलेली आहे. पूर्वी नवी मुंबईतील खेळाडूंना ठाणे जिल्हयामध्ये तालुका स्तरावर प्रथम खेळून ठाणे जिल्हयात विविध तालुक्यामध्ये स्पर्धांचे आयोजन होत असल्याने त्याठिकाणी जावे लागत असे. त्यामुळे स्पर्धांमध्ये नवी मुंबईतील बहूतांश शाळा सहभागी होत नसत.
मात्र आता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळांचा सहभाग वाढत जाऊन आज २५० हून अधिक शाळांचा आणि ४५ हजार हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभत आहे. विशेषत: मुंबई विभागामध्ये राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक खेळणारे खेळाडू हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत या अभिमानाची बाब आहे. या अनुषंगाने खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याच्या ठरावास महानगरपालिका सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडूंना गतवर्षीची क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करून खेळाडूंचा सत्कार तसेच क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी सहयोग करणा-या संस्थांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मान्यतेने विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आणि सध्या पोलीस दल ठाणे येथे पोलीस उपायुक्त – वाहतूक या पदावर कार्यरत असलेले पंकज शिरसाट यांनी उपस्थित राहून प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करीत आपल्या मनोगतात खेळाडूंनी सरावास व मेहनतीस अधिक महत्व द्यायला हवे असे सांगितले. खेळाडूंनी मैदानाची सेवा करणे अत्यंत गरजेचे असून पालकांनीसुध्दा मुलांना खेळामध्ये काय मिळेल यापेक्षा आपण खेळासाठी अधिक चांगले काय करुन शकतो यावर लक्ष देऊन खेळण्यास सांगितले पाहिजे. यातून मुलांना खेळात नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. ब-याचदा खेळाडू संघांत निवड झाली नाही, अन्याय होतोय म्हणून खेळ सोडून देतात. मात्र होणा-या अन्यायाकडे दुर्लक्ष करुन ज्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्यावर अन्याय केला जाऊ शकत नाही याची खूणगाठ मनाशी बांधून स्वत:ला सिध्द करुन दाखवायला हवे असा आत्मविश्वास देत आपण स्वतः याचे उदाहरण असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे खेळामध्ये दुखापती या येतच असतात, त्याला न घाबरता लढले पाहिजे. जो घाबरला तो थांबला, जो लढणार तो जिंकणारच असे त्यांनी मनोगतात स्पष्ट केले.
या कार्यक्रमाप्रसंगी गणेश नाईक, विधानसभा सदस्य, ऐरोली यांच्या शुभहस्ते नवी मुंबई शहरातील क्रीडा सुविधा असलेल्या आणि स्पर्धा आयोजनास सहयोग करणाऱ्या खाजगी स्पोर्टस असोसिएशन, जिमखाना व शाळा, महाविद्यालये यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सन २०२२-२३ मधील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त व क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या ९३६ खेळाडूंपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १० खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ९३६ खेळाडूंना रू. ३०.६२ लक्ष इतकी क्रीडा शिष्यवृती रक्कम ऑनलाईन पध्दतीने खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये आ. गणेश नाईक यांनी जिल्हा स्तरापासून राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करणा-या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचा आनंद व्यक्त केला तसेच राज्यामध्ये “आमदार चषक” या नावाने शालेय स्तरापासून विविध खेळांच्या स्पर्धा आयोजनाची सुरुवातही सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये १९९० मध्ये केली असल्याचे सांगितले. त्यामुळे आज नवी मुंबई शहरातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होताना दिसत आहेत. याकरिता शहरातील स्पोर्टस असोसिएशन्स यामध्ये नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनने पुढाकार घेऊन जागतिक पातळीच्या क्रीडा सुविधा तयार केल्या व त्यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन सुध्दा करण्यात येत असते असे सांगितले. त्याचबरोबरीने शहरातील ऐरोली स्पोर्टस असोसिएशन आणि नेरुळ जिमखाना यासारख्या संस्थाही उत्तम प्रकारे योगदान देत असून त्यांचे काम सुध्दा उल्लेखनीय आहे. इतकेच नव्हे तर अनेक खाजगी शाळा, महाविद्यालये सुध्दा आपापल्या परीने क्रीडा सुविधा व खेळाडूंना प्रशिक्षण देऊन खेळाडू घडविण्याचे कार्य करीत असून त्यांनी असेच काम करत रहावे असे मत व्यक्त करीत अशा संस्थांचा आज सन्मान करताना अधिक आनंद होत असल्याची भावना मांडली.
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विविध खेळांच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक स्पर्धांचे आयोजन केले जाते, इतक्या मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धा आयोजित करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विभागाचे अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हास्तर स्पर्धा आयोजन समिती सदस्य धनंजय वनमाळी व सुधीर थळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कार, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन, ऐरोली स्पोर्टस असोसिएशन, नेरुळ जिमखाना तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे पदाधिकारी, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व मोठया संख्येने विविध शाळांमधील खेळाडू व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोलकुमार वाघमारे यांनी केले.
