नमुंमपा क्षेत्रातील रहिवासी पार्किंगबाबत ऑनलाईन लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन
नवी मुंबई, दि. १७: नवी मुंबई महानगरपालिका बांधकाम नियमावलीतील पार्किंग नियमांच्या अनुषंगाने जनहित याचिका क्र. १२३/२०१६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी आदेश पारित करुन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राच्या बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराकरिता आवश्यक असलेल्या पार्किंगच्या आवश्यकतेबाबत महापालिका आयुक्त यांनी तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करावी आणि सदर समितीने सर्वेक्षण व अभ्यास करुन त्याबाबत महानगरपालिकेस व शासनास योग्य त्या शिफारशी कराव्यात असे आदेशित केलेले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या सदर आदेशानुसार महापालिका आयुक्त यांचे मान्यतेने तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीच्या बैठका वेळोवेळी पार पडलेल्या असून बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराच्या पार्किंगच्या आवश्यकतेबाबत नागरिकांकडून ऑनलाईन सर्वेक्षण करणेकरिता प्रश्नावली तयार करण्यात आलेली असून त्यानुसार नवी मुंबई शहरातील नागरिकांकडून सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.
सदर सर्वेक्षणाअंती प्राप्त होणाऱ्या माहितीवरुन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराकरिता माफक व पुरेशा पार्कींगच्या तरतुदींबाबत तज्ज्ञ समितीस पार्किंगच्या आवश्यकतेच्या अनुषंगाने समितीचा अहवाल महानगरपालिकेस योग्य त्या शिफारशींसह सादर करणे शक्य होईल. तरी याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी यांना आवाहन करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या https://forms.gle/vrTFN3kbfFdiLS7M9 या लिंकवर माहिती भरुन सर्वेक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, जेणेकरुन पार्किंगच्या बाबत नियमावलीतील तरतुदीमध्ये आवश्यकता असल्यास सुधारणा करणेबाबत शासनास नवी मुंबई महानगरपालिकेकडून शिफारस करता येईल.
