भारतीय नागरिकांसाठी इराण सरकारचं व्हिसामुक्त धोरण जाहीर
मुंबई, दि. ७: इराण सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त धोरण जाहीर केलं आहे. हे व्हिसामुक्त धोरण केवळ हवाई मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांसाठीच लागू असेल. या अंतर्गत सामान्य पारपत्रावर भारतीय नागरिकांना सहा महिन्यात एकदा जास्तीतजास्त पंधरा दिवसांसाठी व्हिसाशिवाय इराणमध्ये राहता येईल. परंतु भारतीय नागरिकांना या पेक्षा अधिक कालावधीसाठी इराणमध्ये रहायचं असेल किंवा सहा महिन्यांच्या कालावधीत एकापेक्षा जास्त वेळा इराणला भेट द्यायची असेल तर रीतसर व्हिसा मिळवणं अनिवार्य राहील. मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड या देशांसह सध्या एकूण २७ देशामधे प्रवेशासाठी भारतीय नागरिकांना व्हिसा ची गरज नाही.
