भारतीय रेल्वेकडून डिसेंबर २०२३ पर्यंत ११५४.६७ मेट्रिक टन मालवाहतूक
नवी दिल्ली, दि. ५: भारतीय रेल्वेकडून एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत ११५४.६७ मेट्रिक टन एकूण मालवाहतूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११०९.३८ मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५.२८ मेट्रिक टन वाढ झाली आहे. रेल्वेने १,२५,१०६.२ कोटी रुपये महसूल मिळवला असून गेल्या वर्षी १,२०,४७९.३ कोटी रुपये प्राप्त केले होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या महसुलाच्या तुलनेत यंदा ४६२६.९२ कोटी रुपये वाढ झाली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये १३९८.९९ मेट्रिक टन प्रारंभिक मालवाहतूक साध्य झाली असून डिसेंबर २०२२ मध्ये ती १३०.६६ मेट्रिक टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६.३७ % सुधारणा झाली आहे. मालवाहतुकीतून डिसेंबर २०२३ मध्ये १५,०९७.६१ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला असून डिसेंबर २०२२ मध्ये १४,५७४.२५ कोटी रुपये प्राप्त केले आहेत. यात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३.५९ % सुधारणा आहे.
”हंग्री फॉर कार्गो” (मालवाहतुकीची क्षुधा) हा मंत्र अनुसरत भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि सुगम धोरण निर्मितीद्वारे समर्थित व्यवसाय विकास युनिट्सच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यात साहाय्य मिळाले.
