नवी मुंबई महानगरपालिका आंतरविभागीय बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धा संपन्न
नवी मुंबई, दि. २२: नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये शारीरिक व मानसिक तणावापासून मुक्त रहावे तसेच त्यांच्यामधील सुप्त क्रीडा व कला गुणांना वाव मिळावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या १ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत असलेल्या ३२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महानगरपालिका आंतरविभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील व्हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धा या यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी बेलापूर येथे तसेच बॅडमिंटन स्पर्धा वाशी येथे नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशन याठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता पुरुष व महिला डबल्स बॅडमिंटन, पुरुष वर्गाकरिता व्हॉलीबॉल व महिला कर्मचा-यांकरिता थ्रो बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नमुंमपा आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत यावर्षी पहिल्यांदाच बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत ३० पुरूष व २२ महिला अधिकारी, कर्मचारी समुह सहभागी झाले होते. पुरुषांमध्ये अंतिम फेरीची लढत राजेंद्र कोळी व सुर्या गझणे विरुध्द सचिन मस्तुद व सनी पाटील यांच्यामध्ये झाली. यात २१/१६ अशा ०५ गुणांच्या फरकाने राजेंद्र कोळी व सुर्या गझणे यांनी अंतिम विजेतेपद पटकाविले. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात अंतिम फेरीत अदिती कुवेसकर व रुपाली वाणीवडेकर विरुध्द प्राजक्ता पिंगळे व प्रतिभा गोल्हार यांच्यामध्ये सामना झाला. यात २१/१७ अशाप्रकारे ०४ गुणांनी अदिती कुवेसकर व रुपाली वाणीवडेकर यांनी अंतिम विजेतेपद संपादन केले.

व्हॉलीबॉल स्पर्धेत १० विभागांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये उपांत्य फेरित अग्निशमन विभाग विरुध्द लेखा विभाग यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात अग्निशमन दल २१/१५ अशाप्रकारे ०६ गुणांनी विजयी होऊ अंतिम फेरीत दाखल झाले. दुसरी उपांत्य फेरी मालमत्ताकर आकारणी विभाग विरुध्द सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ यांच्यामध्ये झाली. यात मालमत्ताकर आकारणी विभाग २१/१२ अशा ९ गुणांनी विजय संपादन करून अंतिम फेरीत दाखल झाले. व्हॉलीबॉलच्या अंतिम फेरीची लढत अग्निशमन विभाग व मालमत्ताकर आकारणी विभाग यांच्यात अतिशय चुरशीची झाली. या लढतीमध्ये अग्निशमन विभागाने २१/१८ अशा ३ गुणांनी विजय संपादन करत अंतिम विजेतेपद पटकावले.
महिला वर्गासाठी घेण्यात आलेल्या थ्रो बॉल स्पर्धेमध्ये एकूण ११ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उपांत्य फेरीत प्रशासन विभाग विरुध्द शिक्षण विभाग यांच्यामधील सामन्यात प्रशासन विभागाने २१/१७ असा ४ गुणांनी विजय संपादन केला व अंतिम फेरीत मजल मारली. दुसरी उपांत्य फेरी शहर अभियंता विभाग विरुध्द सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ यांच्यामध्ये होऊन त्यात सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ हे २१/१० अशा ११ गुणांनी विजयी झाले. थ्रोबॉलच्या अंतिम फेरीत प्रशासन विभागाने सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ यांच्यावर अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये २१/१९ अशी मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिन समारंभात या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
