उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
नागपूर, दि. ६: नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी नागपूरच्या रविभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात दंगली, कायदा सुव्यवस्था, दुष्काळ, अवकाळीकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष, राज्यात शांतता नसल्याने आर्थिक गुंतवणूक कशी येणार असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
दुष्काळाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता स्वतः राज्य सरकार आपल्या दारी कार्यक्रमावर अमाप उधळपट्टी करत आहे. अवकाळी पावसाने चार लाख हेक्टरहून अधिक शेती बाधित झाल्यानं चालू हंगामाच्या शेती कर्जाची माफी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.सार्वजनिक रुग्णालयात होणारे मृत्यू विदारक आहे. आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. सरकारी तिजोरीतून हे सरकार स्वतःचा राजकीय प्रचार करून घेत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
Source – AIR
