नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर
नवी दिल्ली, दि. २२: नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक काल राज्यसभेत एकमताने मंजूर झालं. २१४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मत नोंदवलं. याआधी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं होतं. या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यानं आता ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल; त्यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल. या ऐतिहासिक विधेयकाच्या मंजुरीनंतर सभागृहाचं कामकाज, नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच संस्थगित करण्यात आलं. लोकसभेत चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं अभिनंदन करणारा ठराव मंजूर झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज संस्थगित करण्यात आलं. नारी शक्ती वंदन विधेयकावर दोन्ही सभागृहांमध्ये विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही सभागृहातल्या एकंदर १३२ सदस्यांनी यावर आपापली मतं मांडली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितलं. विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले. या विधेयकामुळं देशवासियांमध्ये नवा विश्वास निर्माण होईल, तसंच विविध राजकीय पक्षांच्या सकारात्मक विचारांमुळं महिला सक्षमीकरणाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source – AIR
