‘नमुमपा’ ने केलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत १ लक्ष ६० हजार दंडवसूली व ५३ किलोहून अधिक प्लास्टिक जप्त
नवी मुंबई, दि. ७: स्वच्छता आणि पर्यावरणामध्ये प्लास्टिक हा अतिशय मोठा घातक असा अडथळा असून प्लास्टिकमुक्त नवी मुंबई हे उदिदष्ट नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी एकल प्लास्टिकचा वापर टाळावा याकरिता विविध मध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कच-यात टाकलेल्या प्लास्टिक संकलन मोहीमादेखील जनसहभागातून राबविल्या जात आहेत, तसेच टाकाऊतून टिकाऊ साहित्यनिर्मिती उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात विशेषत्वाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर अथवा साठा आढळलेली 28 दुकाने, आस्थापना यांच्यावर कारवाई करीत रु. 1 लक्ष 60 हजार दंडात्मक रक्क्म वसूल करण्यात आली. तसेच 53 किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
सदर कारवाईत बेलापूर विभागात 6 दुकानदारांकडून 30 हजार दंडात्मक रक्कम व 4 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त, वाशी विभागात 11 दुकानदारांकडून 65 हजार दंडात्मक रक्कम व 15 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त, तुर्भे विभागात 5 दुकानदारांकडून 25 हजार दंडात्मक रक्कम व 22 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त आणि कोपरखैरणे विभागात 6 दुकानदारांकडून 40 हजार दंडात्मक रक्कम व 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचनेव्दारे जाहीर केल्या असून सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम – 2016 अन्वये पॉलिस्टीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह सिंगल यूज प्लास्टिकलाही बंदी घालण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास पहिल्या गुन्ह्याच्या वेळी रु. 5 हजार, दुस-यांदा गुन्हा घडल्यास रु. 10 हजार आणि तिस-या गुन्हाच्या वेळी रु. 25 हजार व तीन महिन्यांचा कारावास राहील असे जाहीर करण्यात आलेले आहे. तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणा-या प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णत: टाळावा तसेच दुकानदारांनीही प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून ठेवू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.
