९ नोव्हेंबरपासून चंद्रचूड यांची नियुक्ती लागू होईल
मुंबई, दि. १७ : देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करायला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजुरी दिली. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत येत्या ८ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहे. ज्येष्ठताक्रमानुसार पुढचे न्यायाधीश चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस त्यांनी सरकारला केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी या नियुक्तीला मंजुरी दिली. ९ नोव्हेंबरपासून चंद्रचूड यांची नियुक्ती लागू होईल.
चंद्रचूड यांनी न्यायिक विज्ञान या विषयात अमेरिकेतल्या हॉर्वर्ड कायदे विद्यालयातून, डॉक्टरेट मिळवली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे. २०१६ मधे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश होतील.
