उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार राष्ट्रपती पदकाने सन्मानित
उरण, दि. १४ (विठ्ठल ममताबादे) : गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी दरबार हॅाल, राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलातील २०२०/२०२१ चे राष्ट्रपती पदक प्राप्त ११४ पोलीस अधिकारी/अंमलदारांना राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक रजनिश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, मुख्य सचिव आनंद लिमये व इतर मान्यवर उपस्थित होते.
संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक-उरण वाहतुक शाखा यांना यावेळी राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जनसंपर्कामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गंभीर स्वरुपाचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे, ३३ वर्षाच्या सेवेत वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांची गुप्त माहीती काढून धडक कारवाई करुन महाराष्ट्र सह इतर राज्यातील खुन, खंडणी, दरोडा सारखे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात हातखंडा, नवी मुंबई गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक, दरोडा प्रतिबंधक पथक, इतर SIT मधे सकारात्मक योगदान व निष्कलंक गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. संजय पवार पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा उरण यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग, नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक, विविध सामाजिक संघटना यांनी संजय पवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
