वीस वर्षांची अखंड परंपरा जपणारं उरण-पुनाडे येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ
उरण, दि ४ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य असं पुनाडे गांव सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणारं गांव ! या गावात अनेक सामाजिक संस्था आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपलं सामाजिक दायित्व जपत असतात! तर अनेक सांस्कृतिक मंडळ आपल्या सण – संस्कृतीच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपतानां दिसतात ! त्यातलंच एक नाव सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे, हे पुनाडे गावांतील नावाजलेलं सांस्कृतिक मंडळ. अश्विन मासातील शारदीय उत्सवाच्या काळात आपल्या मंडळाच्या आयोजनातून सुंदर अशा नवसाला पावणाऱ्या दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून चालणाऱ्या ह्या पावन पवित्र उत्सवाच्या दिवसांत अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करून आपल्या मंडळाच्या माध्यमातुन गेली वीस वर्षे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे मंडळ आज आपल्या ५० सभासदांच्या एकजुटीतून साकारत असलेल्या ह्या भक्तिमय उत्सवाच्या माध्यमातून फक्त हे मंडळ आपल्या गावांपुरतं मर्यादित न राहता आजूबाजूच्या परिसरात नावारूपाला आलं आहे.
गेली वीस वर्ष सांस्कृतिक कार्यासोबतच सामाजिक कार्याची अखंड परंपरा जपणारं हे सेवाभावी मंडळ आज पण गावाची एकता आणि अखंडता कायम टिकून राहावी या करिता मंडळातील सर्व सदस्य एकत्रित येऊन गावांत सामाजिक सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून आपल्या मंडळाच्या माध्यमातून गावाचं नाव मोठं कसं करता येईल हा एकच ध्यास मनाशी बाळगून समाजहिताची अनेक कामं देखील करत असतात.
नवदुर्गा मातेच्या उत्सवाच्या काळात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे या मंडळाच्या वतीने उत्सवाच्या दिवसांत विविध कार्यक्रमांच अयोजना केलं जातं. हे सर्व करत असताना मंडळातील सर्व सभासदांचं योगदान वाखाणण्याजोग असंच असतं ! उत्सव काळात सांज-सकाळी मातेच्या चरणी धूपआरती करून मनोभावे पूजा अर्चा केली जाते. सोबतच आपल्या सण-संस्कृतीचं आपल्या परंपरेचं, अस्मितेचं जतन व्हावं म्हणून आपल्या वारकरी परंपरे नुसार सुश्राव्य भजन-कीर्तनाच्या रूपाने भक्तिमय कार्यक्रमाद्वारे भाविकांना या आनंदमय पर्वणीतून मंत्रमुग्ध करून दुर्गामातेची आराधना केली जाते. सोबतच खास महिलां-भगिनींकरिता आणि बाळगोपाळांकरिता विविध मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन देखील केलं जातंय व रात्रीच्या वेळी दुर्गामातेच्या मंडपात भक्तगण विविध प्रकारच्या वेशभूषा करून गरबानृत्य सादर करत आपला आनंदोत्सव साजरा करतानां दिसतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या आणि बेंजोच्या गजरात भव्य मिरवणूक काढत दुर्गामातेचं विसर्जन केले जातेय ! हे सर्व पाहता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि भक्तिमय वारसा जपणाऱ्या सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे या सेवाभावी मंडळाच्या आयोजनातून साजरा होणारा नवरात्री उत्सव सर्वांपुढे एक आदर्श निर्माण करणारा असाच आहे ! आणि म्हणून पुनाडे गावांत साजरा होणारा हा दुर्गामातेचा उत्सव ही वीस वर्षांची अखंड परंपरा सांगण्या ऐकण्याची नव्हे तर अनुभवायची गोष्ट आहे ! हा आनंदोत्सव, ही परंपरा जर पहायची असेल, अनुभवायची असेल तर या नवरात्रीच्या उत्सव काळात पुनाडे गावांतील या आदर्शवत अशा सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळच्या या उत्सव सोहळ्याला एक वेळ जरूर भेट द्यायला हवी.
