तेजस लढाऊ विमान अर्जेंटिनाच्या हवाई दलात सामील करून घ्यायला अर्जेंटिना उत्सुक असल्याची परराष्ट्र व्यवहारमंत्री यांची माहिती
नवी दिल्ली/मुंबई, दि. २७ : मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत भारतात बनवलेलं तेजस हे लढाऊ विमान अर्जेंटिनाच्या हवाई दलात सामील करून घ्यायला अर्जेंटिना उत्सुक असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. डॉ.जयशंकर सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही राष्ट्रातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर भर दिल्याचं ते म्हणाले.
डॉ. एस. जयशंकर आणि अर्जेंटिनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सँटियागो कॅफिरो यांनी ब्युनोस आयर्स इथं संयुक्त आयोगाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीत संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ, औषधनिर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, योगाभ्यास, हवामान बदल आणि आर्थिक क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्यात आला.
२०२१ मध्ये भारताला अर्जेंटिनाचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनवणारा द्विपक्षीय व्यापार ५.७ अब्ज अमेरिकी डॉलरस वर पोहोचल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. कोविड महामारीपश्चात काळात जागतिक स्तरावरच्या भूराजकीय आव्हानांचा एकत्रित सामना करण्यावर तसंच सशस्त्र दल देवाणघेवाण आणि संरक्षण संबंधित उपकरणांचं उत्पादन संयुक्तरीत्या करण्यावर देखील यावेळी सहमती झाली.
