Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्वातंत्र्य संग्रामातील १८५७ ते १९४७ कालखंडाच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे सोलापूर रेल्वे स्थानकावर उद्घाटन

“स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी” – खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी कुटुंबाचा त्याग केला. कठोर परिश्रम केले, स्वत:चे बलिदान दिले. त्यांचा स्वातंत्र्य काळातील इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर व मध्‍य रेल्‍वे विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने रेल्वे स्टेशन येथे भरविण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. महास्वामी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

डॉ. महास्वामी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त भरवण्यात आलेले दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यामध्ये बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींना या निमित्ताने अभिवादन करतो. देशातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून सर्व नागरिकांनी आवर्जून पहावे.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेले हे प्रदर्शन युवा पिढीसाठी उपयुक्त आहे. स्वातंत्र्य काळातील त्याग, बलिदान, अत्याचार या इतिहासाची आठवण सर्वांना व्हावी, या उद्देशाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाबरोबर फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्तच्या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

रेल्वे स्थानकावरील प्रदर्शन आजपासून १७ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रदर्शनामध्ये १७५७ ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, १८५७ च्या उठावातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे छायाचित्र व मजकूर, राजाराममोहन रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ अ‍ॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मॅडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाल, अरविंद घोष, लाला लजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफअली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार आणि खिलाफत चळवळ, बार्डोली सत्याग्रह, चौराचौरा, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, फाळणी, स्वातंत्र्यदिन, संस्थानांचे विलिनीकरण आणि संविधान सभा आदी महत्वपूर्ण घटनांची दुर्मिळ छायाचित्र आणि मजकूरांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते नागरकोईल एक्स्प्रेसमधील प्रवाशांना तिरंगा ध्वज आणि मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक शैलेश गुप्ता, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *