कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नसल्याचा मेटेंच्या सहकार्याचा आरोप
मुंबई/पनवेल, दि. १४ : आज पहाटे ५ वाजता मराठा समाजाचे नेते व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचं निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी एकनाथ कदम व बॉडी गार्ड सोबत होते. जवळपास एक तासाने मेटे यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या अपघातात मेटे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस व हाताला गंभीर दुखापत झाली होती.
एका वृत्त वाहिनीच्या प्रतीनिधीशी बोलताना अपघातात बचावलेले विनायक मेटे यांचे सहकारी कदम म्हणाले की, “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”
आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
