राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी मतदानास सकाळी १० पासून झाली सुरुवात
नवी दिल्ली/मुंबई, दि. १८ : देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज देशभरात मतदान सुरू आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेलं हे मतदान संध्याकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं उमेदवारी दिली आहे तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. या निवडणुकीत ७७६ खासदारांसह एकूण ४ हजार ८०९ मतदार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अनुराग ठाकूर, मनसुख मांडवीय यांनी सकाळीच संसद भवनात मतदान केलं. गुरुवारी २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येईल. राज्यातही मुंबईत विधानभवनात राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला सुरू आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २६४ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
