द्रौपदी मुर्मू एनडीएच्या उमेदवार तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार
मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या सोळाव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. संसद भवन आणि सर्व राज्यातल्या विधानसभांच्या आवारात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू एनडीएच्या उमेदवार आहेत तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. एकूण मतदारांची संख्या ४ हजार ८०९ असेल. यामध्ये ७७६ संसद सदस्य आणि चार हजार तेहतीस विधानसभेचे सदस्य असतील. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे.
निवडणुकीदरम्यान मतदान आणि मतमोजणीच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं ३७ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधानसभेच्या मतदानाच्या प्रत्येक ३० ठिकाणी मतदानावर देखरेख ठेवण्यासाठी एक निरीक्षक आणि संसद भवनासाठी दोन निरीक्षक आयोगानं नियुक्त केले आहेत. नियुक्त निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी मतपेट्या आणि निवडणूक साहित्याच्या सुरक्षिततेसाठी तसंच वाहतुकीसाठी केलेल्या निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतील.
Source – AIR
