”पुणे- सातारा, महामार्गावर खंबाटकी घाटात नव्या सहापदरी बोगद्याचं काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : पुणे-सातारा, महामार्गावर खंबाटकी घाटात नव्या सहापदरी बोगद्याचं काम पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हा बोगदा प्रत्येकी ती मार्गिकांचा दुहेरी बोगदा असून, त्याची लांबी सहा किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे ९२६ कोटी रुपये असल्याचं, गडकरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
सातारा-पुणे मार्गावर सध्या असलेल्या तीव्र वळणाचं काम लवकरच पूर्ण होईल, त्यामुळे अपघाताची जोखीम बऱ्याच अंशी कमी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांचा कायापालट होत आहे. नव्या भारताला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे, असं गडकरी यांनी म्हटलय.
