काँग्रेसकडून ‘या’ नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले, प्रचारही सुरु झाला पण काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार काही ठरत नव्हता. पण काल पुण्यातील उमेदवाराचा सुरु असलेला तिढा कायमचा सुटला आहे. मोहन जोशी यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची आज ९ वी यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुण्यातून प्रवीण गायकवाड, सुरेखा पुणेकर अशा अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी अखेर मोहन जोशी यांची निवड केली.मोहन जोशी यांनी पुणे युवा काँग्रेस, महाराष्ट्र युवा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्याचप्रमाणे २००४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली आहे.
