शाळा प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आयसीएल शाळा पालक संघटना करणार आंदोलन
नवी मुंबई, वाशीस्थित आयसीएल हायस्कूल(ICL High School) च्या शाळा व्यवस्थापनाने मागील वर्षी २०२०/२०२१ मध्ये कोरोना प्रादुर्भावाचे कारण देत फक्त मराठी माध्यमांचे नवीन प्रवेश बंद केलेले होते. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेलाच हद्दपार करण्याचा कुटील डाव सदर शाळा व्यवस्थापनाने रचला होता परंतू काही जागरुक पालकांनी आणि शाळेच्या पालक प्रतिनिधींनी एकत्रितरित्या आयसीएल शाळा पालक संघटना स्थापन करून त्याद्वारे शिक्षणाधिकारी तसेच शालेय शिक्षण बोर्ड अशा अनेक ठिकाणी रितसर पत्रव्यवहार करुन न्याय मागितला तरीही यश येत नसल्याने अखेर शाळेच्या गेट समोर तसेच नवी मुंबई मुख्यालयासमोर आंदोलन केले. अखेर शिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन न्याय मागितला तेव्हा कुठे तीन महिन्यांच्या तीव्र संघर्षानंतर जवळपास ७० ते ८० विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे प्रवेश मिळाले होते.
यावर्षी पुन्हा आयसीएल शाळेने जाणिवपूर्वक मराठी माध्यम टप्या-टप्प्याने बंद करुन इंग्रजी माध्यमांचे प्रवेश चालु ठेवण्याचे कुटील कारस्थान आखले आहे. त्यानुसार शाळेने मुद्दामहून मराठी माध्यमांचे प्रवेश घेऊ इच्छित पालकांना जुन महिन्या मध्येच ॲडमिशन मिळतील तुम्ही तेव्हाच यावे असे सांगून वेळ मारुन नेली. शाळेला माहीत होते. जुन नंतर आपण प्रवेश नाकारले तर पालक आपोआपच इतर शाळेत प्रवेश घेतील आणि आपल्याला इंग्रजी माध्यमांचे भरपुर डोनेशन मिळवता येईल. असेच टप्प्या टप्प्याने शाळेतील मराठी माध्यम कायमचे बंद करता येईल.
परंतु यावर्षीही जवळपास ७० ते ८० पालकांनी आयसीएल शाळा पालक संघटनेकडे धाव घेऊन ह्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार आयसीएल शाळा पालक संघटनेचे प्रमुख नरेंद्र वैराळ तसेच अनिल घाणेकर, संतोष माने, सतीश वाळुंज, मनाली आंब्रे, मनिषा गुप्ता व इतर प्रतिनिधींनी आरटीई २००९ या कायद्यान्वये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार असुन कोणत्याही इयत्तेच्या विद्यार्थ्याला कोणतीही शाळा प्रवेश नाकारु शकत नाही या राज्य तसेच केंद्र सरकारच्या आदेशानूसार सुरुवातीला नवी मुंबई महानगर पालिकेतील शिक्षणाधिकारी अरुणा रघुनाथ यादव यांना प्रवेश मिळावे म्हणून तक्रार केली त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी दहीतुले तसेच भाऊसाहेब कोरेकर यांना १६/०६/२२ रोजी तक्रार दिली. तरीही शाळेने प्रवेश चालु केले नाहीत म्हणुन शुक्रवार दिनांक २४/०६/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता सर्व पालक आयसीएल शाळेच्या गेट समोर एकत्र जमून शांतताप्रिय पद्धतीने आंदोलन करून न्यायाची मागणी करणार आहेत.




