बंदूक नियंत्रण कडक करण्यासाठी हजारोंचे मोर्चे
अमेरिकेत गेल्या काही काळात बंदुकींचा वापर करुन झालेल्या हत्याकांडांच्या पार्श्वभूमीवर बंदूकविषयक कडक कायदे करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिकांनी संपूर्ण अमेरिकेत काल निदर्शनं केली. गोळीबारातील मृत्यूपासून मला स्वातंत्र्य हवं आहे अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शकांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. अध्यक्ष जो बायडन यांनी या निदर्शकांना पाठिंबा दिला असून, बंदूकविषय़क कायदे मंजूर करण्याचं आवाहन अमेरिकी संसदेला केलं आहे.
टेक्सासमध्ये युवाल्ड इथं प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात एकोणीस शालेय विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. न्यूयॉर्कमध्ये बफेलोमध्ये झालेल्या गोळीबारातही दहा जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं झाली.
फ्लोरिडामध्ये २०१८ मध्ये झालेल्या गोळीबारातून वाचलेल्यांनी स्थापन केलेल्या आमच्या जीवनासाठी बंदूक सुरक्षा संघटनेनं म्हणजे एमएफओएलनं म्हटलं आहे, की बंदूकविषयक कडक कायद्यांसाठी वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्कसह अमेरिकेत साडेचारशे ठिकाणी निदर्शनं केली जातील. लोकांचे मृत्यू होत असताना राजकीय नेत्यांना स्वस्थ बसू दिलं जाणार नाही, असंही या संघटनेनं म्हटलं आहे.
