आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
श्रीलंका सरकारनं काल देशात आणीबाणी जाहीर केली. देशात आर्थिक संकट उद्भवल्यामुळे हजारो संतप्त नागरिकांनी काल श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर धडक मारत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी विशेष आदेश जारी करत तातडीनं सार्वजनिक आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अनेक कठोर कायदे लागू करण्याचे आदेश राजपक्ष यांनी दिले आहेत. यानुसार, कोणाही संशयित व्यक्तीला चौकशी न करता अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवण्याचे किंवा अटक करण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत.
श्रीलंकेतल्या पश्चिम प्रांतात काही तासांसाठी पोलिसांची संचारबंदीही लागू करण्यात आली होती. जनतेनं काल अध्यक्षीय निवासस्थानासमोर जमा होत मोठं आंदोलन केलं होतं. देशासमोरच्या समस्या सोडवण्यात सरकारला अपयश आल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. यावेळी आंदोलकांचा पोलिसांबरोबर संघर्ष होऊन त्यात किमान १० जण जखमी झाले. कोरोना काळात पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्यानं श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या देशात सध्या परकी चलन तुटवडा असल्यानं अन्न, इंधन आणि ऊर्जेची कमतरता निर्माण झाली आहे.
