युरोपातील काही देशांमध्येही रुग्ण वाढीचे प्रमाण वाढण्यास झाली सुरुवात
मुंबई/नवी दिल्ली: युरोप आणि पूर्व आशियातल्या काही देशांमध्ये पुन्हा कोविड-१९चे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठी खबरदारी बाळगण्याच्या, तसंच स्थितीवर बारकाईनं देखरेख ठेवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्या आहेत. जनुकीय चाचण्याही वेगानं करण्याच्या सूचना त्यांनी काल अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्याच्या कोविड लसीकरण स्थितीचा, तसंच जनुकीय चाचण्यांबाबतचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव, एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
चीन, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग, व्हिएतनाम, सिंगापूर आणि युरोपातल्या काही देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. चीनमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. इस्राईलमध्ये कोविडच्या रूप बदललेल्या नवीन विषाणू प्रकाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हा नवीन प्रकार म्हणजे कोविड-१९ च्या ओमिक्रॉनच्या दोन उपप्रकारांचं मिश्रण असल्याचं सांगितलं जात आहे.
