“शिवसेना ओएनजीसी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी” – माजी आमदार मनोहर भोईर
उरण, दि.२४(विठ्ठल ममताबादे): ओएनजीसी प्रकल्पात थेट अधिकारी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिनांक १५/२/२०२२ पासून विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु केले आहे. गेली अनेक वर्षे कामगारांना त्यांच्या मेडिक्लेम, इन्शुरन्स, पीएफ, वेतनवाढ, पेन्शन आदी सुविधापासून वंचित ठेवण्यात आले आहे. हायकोर्ट, सुप्रीमकोर्ट ने आदेश देऊन सुद्धा त्या आदेशाची अंमलबजावणी ओएनजीसी प्रशासन करत नाही. कामगारांच्या सेवा सुविधांकडे ओएनजीसी प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कामगारांवर साखळी उपोषण करण्याची वेळ आली आहे. या समस्ये संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत सुद्धा आवाज उठविला आहे. मात्र ओएनजीसी प्रशासनाने कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेच्या माध्यमातून या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व कामगारांना न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी उरण येथे केले.
ऑइल फिल्ड एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनी, एपीयु गेट समोर दि. १५ फेब्रुवारी २०२२ पासून कामगारांचे विविध मागण्यासाठी साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला जाहीर पाठिंबा देताना माजी आमदार मनोहर भोईर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. असे आश्वासन मनोहर भोईर यांनी उपोषणकर्त्यांना दिला. माजी आमदार मनोहर भोईर यांनी सर्व समस्या समजावून घेत वरिष्ठ स्तरावर याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही उपस्थितांना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उरण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख महादेव घरत, विभागप्रमुख एस. के. पुरो, सरपंच चेतन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मोहन काठे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
