कुन्नुर इथल्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सेनादलाच्या संयुक्त पथकाकडून चौकशी होणार – राजनाथ सिंग
रावत यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असे त्यांनी सदनाला सांगितले. बिपीन रावत वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा महाविद्यालयातल्या प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी जात होते. काल सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी सुलुरच्या हवाई दलाच्या तळावरुन त्यांना घेऊन जात असलेल्या हवाई दलाच्या MI 17-V 15 या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं.
सव्वा बारा वाजता ते वेलिंग्टनला पोहोचणं अपेक्षित होतं. १२ वाजून ८ मिनिटांनी या हेलिकॉप्टरचा सुलुर तळाशी संपर्क तुटला. त्याच दरम्यान काही स्थानिकांनी कुन्नूर जवळच्या जंगलात आग लागल्याचं पाहिलं आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी आगीच्या झोतात लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष त्यांना आढळून आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदत आणि बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन हेलिकॉप्टरमधल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
या अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिड्डर, अधिकारी लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि लष्करातले इतर ९ जण होते. या अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग सध्या लष्कराच्या वेलिंग्टन इथल्या रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर असून त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात राजनाथ सिंह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही माहिती देणार आहेत.
