कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करूनच नवरात्रोत्सव साजरा करावे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे
उरण,दि.६(विठ्ठल ममताबादे): यंदाच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. सोशल फिजिकल डिस्टन्स नागरिक पाळत नसल्याने कोरोना रोगाच्या प्रसाराला आमंत्रण मिळत आहे. त्या अनुषंगाने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नवरात्रोत्सवाच्या मंडळाने ढोल, बँजो वाजवत मिरवणूका काढू नयेत. गर्दी होईल असे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फिजिकल डिस्टन्स पाळावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी कोरोना बाबतचे सर्व नियम नवरात्रोत्सवाच्या मंडळानी, मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी पाळावेत अशी स्पष्ट सूचना न्हावा शेवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी नवरात्रोत्सव मंडळाना दिले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्हावा शेवा पोलीस स्टेशन हद्दीतील जसखार, जे.एन.पी.टी., डोंगरी, बेलपाडा, न्हावा, गव्हाण, सोनारी, उलवे आदी विविध ठिकाणाचे नवरात्रोत्सव मंडळ व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये संपन्न झाली. यावेळी कामगार नेते महादेव घरत यांच्यासह पोलीस स्टेशन हद्दीतील विविध नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
