आता पर्यंत ७०० जणांनी घेतली लस
नवी मुंबई, दि.११: नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या तेरणा रूग्णालयात रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लस उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आणि दोन दिवसांत ७०० जणांना ही लस देण्यात आली. लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणे आवश्यक असून या लसीची किंमत १,१४५ रुपये आहे.
भारतात या लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करत आहेत. दरम्यान समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विविध सेवा पुरविताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणा-या कोविडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत असून या अनुषंगाने गृहनिर्माण संस्थांमधील सुरक्षा रक्षकांचे विशेष लसीकरण सत्र काल ऐरोली आणि नेरूळ येथील महापालिका सार्वजनिक रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते.
Source – AIR
