लोकसंख्येची घनता व इतर कारणांमुळे मुंबईत येत्या रविवारपर्यंत तिसऱ्या गटाचे निर्बंध कायम
मुंबई: कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचा दर मुंबईत सध्या ३ पूर्णांक ७९ शतांश टक्के तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर २३ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका आहे. कोविडचा फैलाव रोखण्यासाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या निकषांनुसार मुंबई कोविड विषयक निर्बंधांच्या पहिल्या गटात आहे.
मात्र लोकसंख्येची घनता, भौगोलिक रचना, उपनगरातून दाटीवाटीने प्रवास करुन दररोज मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि टास्क फोर्सने वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेची शक्यता या कारणांमुळे मुंबईत येत्या रविवारपर्यंत तिसऱ्या गटाचे निर्बंध लागू राहतील असे महानगरपालिकेने कळवले आहे. त्यानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने रोज सकाळी ७ ते संध्याकाळी ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ४ या वेळात खुली राहतील.
सर्व मॉल्स थिएटर्स बंद राहतील, उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ पर्यंत खुली राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. विशेष वर्ग वगळता सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे प्रवास बंद राहील. शहर आणि उपनगरात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदी लागू राहील.
Source – AIR
