कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची मिळाली परवानगी
विदेश: पाकिस्तानात अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाला त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानच्या संसदेने याबाबतच्या विधेयकाला काल मंजुरी दिली. तसेच, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाला अनुसरून पाकिस्तानातील न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरआढावा आणि फेरविचार करण्याची मागणी करण्याचा अधिकारही या विधेयकाद्वारे जाधव यांना देण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने मांडलेल्या या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली असल्याने त्याचं कायद्यात रुपांतर झालं असून तो तत्काळ लागू होणार आहे.
२९ मार्च २०१६ रोजी पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तान ने केला होता. तर भारत सरकारचं म्हणणं होतं की पाकिस्तान सैन्याने त्यांचं इराण येथून अपहरण करत त्यांच्यावर खोटे आरोप लगावले.
