इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एकदिवसीय बंदला मुंबईत सकारात्मक प्रतिसाद
भारतीय वैद्यक मध्यवर्ती परिषदेने आयुर्वेद आणि आयुष डॉक्टरांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा आणि दंत उपचारांसह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने आज दिवसभर संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने, बाह्य रुग्ण सेवा बंद असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारे शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देणे हे चुकीच असून ते रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञानी व्यक्त केले आहे. अलोपॅथी आणि आयुष या दोन्ही भिन्न शाखा असून दोन्हीची भूमिका भिन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळी ६ वाजता हा संप सुरू झाला असून तो १२ तासांसाठी असणार आहे.
दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात मक्तेदारी चुकीची आहे असे मत राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संस्थेच्या डॉ. जे. पी. यांनी व्यक्त केले आहे.
अॅंलोपॅथी चिकित्सकांची संघटना आयएमए आपल्या व्यावसायिक हितासाठी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अपप्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयुर्वेदात महर्षि सुश्रुत यांनी ५ हजार वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया केली असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या एकदिवसीय बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिका रुग्णालयाच्या आणि खाजगी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून काम करीत आहेत, तर होमिओपॅथी डॉक्टर गुलाबी फिती लांबून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
पालिकेच्या रुग्णालयात कोविड सेंटर आणि महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
