पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश
नवी दिल्ली, दि.१७: देशाची भौगोलिक रचना आणि विविधता लक्षात घेऊन कोरोनावर येणारी लस जलदगतीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची तजवीज करायचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ते आज देशातल्या कोविड-१९ च्या सध्यस्थितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. लस वितरणासाठी वाहतूक, वितरण आणि प्रशासकीय व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात निवडणुकांचं यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा वापर देशात वितरणाचं जाळं पसरवण्यासाठी करावा असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तीन लसी विकासाच्या मार्गावर असून यातली एक तिसऱ्या तर दोन दुसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक पथकं लस निर्मितीसाठी शेजारी देशांनाही मोठी मदत करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
लस निर्मिती आणि वितरणासाठी वैद्यकीय आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भारतानं केवळ शेजारी देशातच नव्हे तर संपूर्ण जगापर्यंत आपले प्रयत्न पोचवावेत असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिले आहेत.
