राज्यांतर्गत ऑक्सीजन वाहतुकीवर निर्बंध नकोत, केंद्राच्या सूचना
नवी दिल्ली/मुंबई: वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सीजनच्या दोन राज्यांमधल्या वाहतूकीवर कोणतीही बंधनं असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असं आवाहन केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. काही राज्यं वेगवेगळ्या कायद्यांतर्गत ऑक्सीजनच्या मुक्त वाहतूकीला खीळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
ही राज्यं ऑक्सीजन उत्पादकांना आणि पुरवठादारांना केवळ आपल्या राज्यातल्याच रुग्णालयांना तो पुरवण्याचं बंधन घालत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सूचना करणारं पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवलं आहे. कोविड-१९ च्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सीजन मिळेल याची जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे असं आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे.
