दक्षिण मुंबईतील नागपड्यात इमारतीचा भाग कोसळला; अग्निशमन दलाकडून मदतकार्य शिघ्र गतीने चालू
मुंबई दि.२७: राज्यात सध्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना वाढत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी महाड येथील ५ मजली इमारत कोसळली होती ज्यात १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशीच एक दुर्घटना आज मुंबईतील नागपाडा परिसरात घडली.
दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातील मिश्रा बिल्डिंग च्या टॉयलेट चा काही भाग कोसळला असून ढिगाऱ्याखाली ४ जणं अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दक्षिण मुंबईत अनेक बांधकामे धोकादायक अवस्थेत असून काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे ही अधिकाऱ्यांच्या कृपेने चालू असल्याचे महाराष्ट्र वार्ताने मुंबई महानगरपालिकेला पत्राद्वारे नजरेस आणून दिले आहे. तरी अशा बांधकामांवर कारवाई करण्याकडे अधिकारी वर्ग का-कू करत असतो.
