या वर्षी ‘लालबागच्या राजा’चा उत्सव रद्द; पण मंडळ साजरा करणार समाजोपयोगी ‘आरोग्य उत्सव’
मुंबई: जगभर ज्याची ख्याती पोहोचली आहे असा ‘लालबागचा राजा’ यावर्षी गणेशोत्सवादरम्यान विश्रांतीवर असणार आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशाची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी हे मंडळ विविध उपक्रम राबवत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे. या संदर्भातली घोषणा आज मंडळाने अधिकृतरित्या केली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दहा दिवस साजरा केल्या जाणाऱ्या ‘आरोग्य उत्सव’ काळात महारक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे याच सोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधित रुग्णांसाठी मुंबई महानगर पालीकेच्या सहकार्याने प्लाझमा डोनेशन उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमां व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रूपयांची मदत, करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवताना आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि गलवान खो-यात चीनच्या सीमेवर चीनी सैनिकांशी लढताना हिंदुस्थानची सीमा सुरक्षित ठेवताना देशासाठी वीरमरण येऊन शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या भेटीसाठी राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. यात नवसाच्या रंगेत तर लोकं १८-१८ तास उभे असतात. पण सध्या या कोरोनाच्या संकटात गर्दी टाळण्यासाठी असे निर्णय गणेश मंडळांनी घेणे गरजेचे होते. ज्याची सुरुवात लालबागच्या राजापासून झाली आहे. तशीही मुंबईत कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.
