मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नर्स चा गणवेश धारण करत नायर इस्पितळात अवतरल्या
मुंबई: मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर या चक्क नायर इस्पितळात नर्स(परिचारिका) च्या भूमिकेत शिरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर नर्स चा वेष परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला आहे.
आज नायर इस्पितळात कनिष्ठ परिचारिकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिचरिकांना कशा प्रकारे सेवा प्रदान करावी व कोणती काळजी घ्यावी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं.
शिवसेना नगरसेविका होण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सरकारी हॉस्पिटल मध्ये परिचारिका म्हणून अनेक वर्षे काम केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक माजी परिचारिका, डॉक्टर्स यांनी पुनः सेवेत येण्याची व रुग्णांची शुश्रूषा करण्याची तयारी दर्शवली होती. पण आज चक्क मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या किशोरी पेडणेकरांनी परिचारिकेचा गणवेश धारण करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोरोनाचं संकट राज्यावर व त्यातही मुंबईवर घोंगावयाल सुरुवात झाली तेव्हापासून महापौर किशोरी पेडणेकर या दिवसरात्र निरनिराळ्या ठिकाणी भेटी देताना, यंत्रणांशी समन्वय साधताना दिसत आहेत.
